आबा बागुल यांच्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते

0
Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून आदिमायेच्या जागराने पुणे शहर भक्तिभावाने गजबजले आहे. या काळात पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या *पुणे नवरात्र महोत्सवाचे* उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात आयोजित केला जातो. यंदा मात्र महोत्सवाच्या उद्घाटनाला वेगळेच राजकीय रंग मिळाला. विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसपासून दुरावलेले आबा बागुल यांनी आपल्या मंचावर भाजपमधील वजनदार मंत्री आणून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले लक्ष्य साधल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी गेली ३५ वर्षे पाळलेला वैयक्तिक नियमही यावेळी मोडला. उद्घाटनावेळी बावनकुळे म्हणाले, “गेल्या ३५ वर्षांपासून मी घरी घटस्थापना केल्यानंतर दिवसभर महालक्ष्मीची पूजा-अर्चना करतो आणि घराबाहेर जात नाही. पण आबा बागुल यांनी लक्ष्मीमातेचे दर्शन घेण्यासाठी आग्रह केला आणि तो मोडता आला नाही. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हा नियम मोडला आहे.” दरवर्षी महोत्सवाच्या मंचावर काँग्रेस नेत्यांची उपस्थिती असते. मात्र यंदा भाजप नेत्यांचा मोठा जमाव दिसून आला. महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह पर्वती मतदारसंघाच्या आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे हे भाजप नेते एकाच मंचावर आले. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचीही उपस्थिती होती. यामुळे काँग्रेसपासून दुरावलेले आणि नव्या राजकीय समीकरणांच्या शोधात असलेले आबा बागुल यांनी आपला प्रभाव दाखवत भाजपच्या मंत्र्याला मंचावर आणल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागुल यांच्या या पावलाकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.

सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात घटस्थापना

Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात देवीची घटस्थापना करण्यात आली. यावर्षी मंजू राजेश राठी व राजेश धनराज राठी यांच्या हस्ते विधिवत स्थापना झाली. या मंदिराची स्थापना १९९३ मध्ये स्व. धनराज मालचंद राठी यांनी केली. त्यानंतर दरवर्षी नवरात्र महोत्सवासह महाशिवरात्री, दत्तजयंती, हनुमान जयंती, जन्माष्टमी, श्रावण मास, दहीहंडी यांसारखे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र महोत्सवात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती होते. देवीचे नवीन रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरात भोंडला, भजन, प्रवचन, श्रीसुक्त पठण यांचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या महोत्सवात १५१ कन्यांचे कन्यापूजन तसेच हलवा पुरी प्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या २९ वर्षांत देवीच्या आशिर्वादाने अनेक सकारात्मक बदल परिसरात झाले आहेत. मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी मैनाबाई धनराज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली राठी कुटुंब मनोभावे पार पाडत आहे. महिला व मुलांसाठी खाऊ वाटपही करण्यात आले आहे. मंदिराचे पदाधिकारी मगराज राठी म्हणाले, “अंबा माता मंदिर हे सुखसागर कात्रज परिसरातील श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. नवरात्र महोत्सवाने परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते.”

वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’

Newsworldmarathi Mumbai:आयुर्वेद क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’ने सन्मानित करण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केंद्र–राजकोट (टीडीसी पीपीडीसी) आग्रा, MSME मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. समारंभास देशभरातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, डॉ. मंगला कोहली (सल्लागार – UN Child Women व माजी सहायक महानिदेशक, आरोग्य सेवा निदेशालय, भारत सरकार) तसेच डॉ. प्रवीण जोशी (राष्ट्रीय सल्लागार – AIMA व माजी उपनिदेशक, TDC आग्रा) उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून गणेश एम. (सहाय्यक संचालक, विस्तार केंद्र–राजकोट व उदयपूर, MSME TDC, आग्रा) आणि प्रणव पंड्या (प्रशिक्षण अधिकारी, MSME राजकोट) यांनी हजेरी लावली. या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुर्वेद क्षेत्रातील योगदानामुळे डॉ. देशमुख यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना ‘वैद्यरत्न २०२५’, ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रसारक’ (नेपाळ सरकारतर्फे) तसेच ‘वारी वैद्य पुरस्कार’ (माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते) हे सन्मान मिळाले आहेत. या सर्व पुरस्कारांनी डॉ. चंद्रकुमार देशमुख यांचे कार्य अधिक उज्ज्वल झाले असून, आयुर्वेद चिकित्सा व संशोधन क्षेत्रासाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रसार होत असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ते आदर्शवत ठरले आहेत.

आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर

0
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून शैक्षणिक नगरी पुण्यात नवे शैक्षणिक द्वार खुले होत आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात सुरु होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि त्यानंतर Academic Council ने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय अधिकृत झाला आहे. आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यात व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव दिला होता. त्यावर निर्णय होत पुणे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्याच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. पुणे हे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान व औद्योगिक केंद्र म्हणून जलद गतीने विकसित होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे, अत्याधुनिक संशोधन-विकास केंद्रे, वाढती स्टार्टअप संस्कृती आणि Oxford of the East अशी मिळालेली शैक्षणिक ओळख या सर्व पार्श्वभूमीवर आयआयएम मुंबईचा कॅम्पस शहरासाठी केवळ नैसर्गिक पूरकच ठरणार नाही, तर जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाला इथल्या विद्यार्थ्यांना थेट दाराशी आणून देणार आहे. या कॅम्पसच्या माध्यमातून उद्योजकतेला नवा उन्मेष मिळेल, व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी व्यवसायांत रूपांतर साधता येईल. हा उपक्रम स्वावलंबी भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय दृष्टिकोनाला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती देताना आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, ‘आमचा प्रयत्न राहील की शैक्षणिक वर्ष २०२६ पासून प्रस्तावित पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम तसेच अल्पावधी कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करता यावेत. ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. यामुळे आयआयएम मुंबईला विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने मोलाचे योगदान देता येईल.’ कोट मुंबई-पुण्यामध्ये ‘नॉलेज कॉरिडॉर’ तयार होईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ‘पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही अभिमानाची बाब आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन्ही शहरांमध्ये निर्माण होणारा ‘Knowledge Corridor’ ही देशाच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी पर्वणी ठरेल. या निर्णयामुळे महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी ऊर्जा मिळेल आणि नव्या पिढीसमोर संधींचे विस्तीर्ण क्षितिज खुले होईल. पुणे अनेक दशकांपासून देशाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र राहिले आहे आणि आता ते तंत्रज्ञान, उत्पादन तसेच आयटीचे बळकट हब म्हणूनही उदयास आले आहे. याच वैशिष्ट्यांचा विचार करून आयआयएम मुंबई आपला नवा कॅम्पस पुण्यात स्थापन करीत आहे.

सुखसागर येथील श्री अंबामाता मंदिरात नवरात्रौत्सवाची भक्तिमय तयारी

0
Newsworldmarathi Pune: सुखसागर येथील श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा नवरात्रौत्सव भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्वर्गीय धनराजजी मालचंदजी राठी यांनी १९९३ मध्ये सुखसागर नगर परिसरात या ट्रस्टची स्थापना केली होती. गेल्या ३२ वर्षांपासून ट्रस्टतर्फे धार्मिक परंपरा जपत जन्माष्टमी, दत्तजयंती, गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवासारखे अनेक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केले जात आहेत. यंदा सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या पूजाअर्चा, अभिषेक व आरतीसोबतच भजन, दांडिया, भोंडले यांसारखे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७:३० वाजता आरती होणार असून दिवसभर प्रसाद वाटपाची सोय असेल. अष्टमीच्या दिवशी देवीची फुलांनी आकर्षक सजावट केली जाईल. तसेच हलवा-पुरीचा महाप्रसाद भाविकांना दिला जाईल. मान्यवरांच्या हस्ते आरती होणार असून परिसरातील विविध मंडळांतर्फे देवीला तोरण अर्पण केले जाईल. या धार्मिक वातावरणात भाविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून सुरक्षा दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक व सिक्युरिटी गार्ड्सची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोयही केली आहे. विश्वस्त मगराजजी एम. राठी, रविंद्र डी. राठी, राजेश डी. राठी आणि संपूर्ण राठी परिवारासह स्वयंसेवक, तसेच पोलिस यंत्रणा शिस्तबद्ध नियोजनात सक्रिय सहभागी आहेत. दररोज सुमारे पाच ते सहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज आहे. श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे परिसरातील सर्व नागरिक, भाविक व भक्तजनांना नवरात्रोत्सवाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी पश्चिम मंडळाचा सेवा पंधरवडा अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम

Newsworldmarathi Pune: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी तालुका पश्चिम मंडळाच्या वतीने “वृक्षारोपण – एक पेड माँ के नाम” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव सोलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. वृक्षारोपण उपक्रम मुळशी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा, आयटीआय, तसेच कॉलेजेसमध्ये आयोजित करण्यात आला. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धनाबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या “सेवा हेच परमधर्म” या संदेशाशी सुसंगत पद्धतीने समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करणे हा होता. हा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी पश्चिम मंडळ अध्यक्ष लखन तात्याबा गोळे यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडला. या वेळी माजी अध्यक्ष राजाभाऊ वाघ, महामंत्री सुनील शिंदे, सरचिटणीस यशवंत धुमाळ, सरचिटणीस अमोल गोळे, माजी अध्यक्ष एस.सी. मोर्चा निलेश लांडगे, युवा मोर्चा सरचिटणीस संजय दूरकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष संजय पांढरे, युवा मोर्चा चिटणीस सचिन उभे, सोपान बागडे, सचिव सुयोग गोळे, सचिव सागर सुतार, सामाजिक कार्यकर्ते अजय सुतार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधोरेखित केली. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल हीच खरी सेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. वृक्षारोपणासोबतच “हरित मुळशी, समृद्ध भारत” हे ब्रीद घेऊन सर्वांनी अधिक जबाबदारीने पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून, ती पुढील पिढ्यांसाठी हिरवाई टिकवण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. “एक पाऊल समृद्धीकडे – एक पाऊल सेवेकडे!” या संदेशासह सेवा पंधरवड्यातील वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पोषण अभियान; नगरसेविका वर्षा साठे यांचे आयोजन

0
Newsworldmarathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नगरसेविका वर्षा भिमराव साठे आणि भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष भिमराव साठे यांच्या वतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी पोषण अभियान २०२५ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नगरसेविका वर्षा साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला. या अभियानाचा प्रमुख उद्देश महिलांमध्ये आणि बालकांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे, संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देणे तसेच कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाय राबवणे हा आहे. महिलांना व बालकांना योग्य पोषण मिळाले तरच कुटुंब आणि समाज आरोग्यदायी राहील, या विश्वासातून हा उपक्रम हाती घेण्यात आला. “या उपक्रमाचा लाभ परिसरातील प्रत्येक महिलेला घ्यावा आणि पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती पुढे नेण्यात यावी,” असे आवाहन नगरसेविका वर्षा साठे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अरुणा पवार यांनी महिलांना दैनंदिन आहारातील पोषणतत्त्वांची गरज समजावून सांगितली. प्रमुख मार्गदर्शन आरोग्य अधिकारी मृदाला होळकर यांनी केले. महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी कुपोषण टाळण्यासाठी घरगुती पातळीवर सहज करता येणारे उपायही सांगितले. या उपक्रमात सुनिता ओव्हाळ, माधुरी रणसिंग, सुनिता करंडे, रेखा परदेशी, रेखा कांबळे, स्वाती कंक, मानसी वाडेकर, वंदना दिवटे, सरोजा जाधव, दिपाली परदेशी, भाग्यश्री कोळी, श्वेता कांबळे, मंगल वेताळ, स्वाती नागटिळक, इंदुबाई डोळसे, स्वाती पाथरे, सुधा सरकाळे, कुसुम घोग आणि अनेक स्थानिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या अभियानातून महिलांना पोषणमूल्ययुक्त आहाराचे फायदे आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे शिखर गाठल्याचे मत भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष भिमराव साठे यांनी व्यक्त केले.

अखेर सेव्हन लव्हज चौक रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात; मा. नगरसेविका अर्चना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

0
Newsworldmarathi Pune : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित तसेच सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेव्हन लव्हज चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. या रस्ता रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत हा विषय प्राधान्याने पुढे नेला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जवळपास १७ फूट रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीतील अडथळे कमी होऊन सुरक्षिततेची हमी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कामाचे भूमिपूजन मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील आणि पुणे महानगरपालिकेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या हस्ते पार पडले. भूमिपूजनावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले. नागरिकांनी सांगितले की, सेव्हन लव्हज चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण होत असे. रस्ता रुंदीकरणानंतर या भागातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून पादचारी आणि वाहनधारक दोघांसाठीही सुलभता निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार असल्याचे मत मा. नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत साजरा; मा. नगरसेविका रूपाली धाडवे यांचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सामाजिक उपक्रमातून विशेष साजरा करण्यात आला. पुणे शहर भाजप चिटणीस व माजी नगरसेविका रूपाली धाडवे तसेच माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्या पुढाकारातून इंदिरानगर येथील आधार मूकबधिर विद्यालयामध्ये हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याशी जोडलेला हा उपक्रम उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत केक कापून मोदीजींचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हातवारे भाषेतून मोदीजींप्रती आपला आदर व आनंद व्यक्त केला. या सोहळ्यात उपस्थितांना भावनिक वातावरणाचा अनुभव आला. कार्यक्रमाला माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे, सामाजिक नेते बाबुरावजी घाडगे, आधार मूकबधिर विद्यालयाचे प्रमुख अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजातील विशेष घटकांसोबत आनंद वाटण्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न झाल्याचे आयोजकांनी सांगितले. रूपाली धाडवे यांनी सांगितले की, “मोदीजींनी नेहमी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या योजनांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्याच प्रेरणेने आज आम्ही हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे.”

‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियानाचा पुण्यातही प्रारंभ

0
Newsworldmarathi Pune: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम देशभर राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात कमला नेहरु रुग्णालयात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयुक्त नवल किशोर राम, भाजप मा. सभागृह नेते गणेश बिडकर, व भाजपचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत देशभरातील एक लाखांहून अधिक शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करून व्यापक तपासण्या करण्यात येणार आहेत. आपल्या माता आणि भगिनींना समर्पित या उपक्रमाचे ध्येय म्हणजे महिलांसाठी व बालकांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, त्यांची उपलब्धता वाढवणे व जनजागृती करणे हे आहे. याअंतर्गत सर्व आंगणवाड्यांमध्ये ‘पोषण महिना’ साजरा करून समावेशक आरोग्य व पोषणाला चालना दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्या जनभावनेने समाजकार्य केले आहे, त्याच भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या या अभियानाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले.