राज्यात पावसाचा कहर ! 7 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका, हवामान विभागाचा 24 तासांचा गंभीर इशारा
Newsworldmarathi Pune: Maharashtra Whether Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते खचले, तर काही महामार्ग दरड कोसळल्याने तात्पुरते बंद झाले. हवामान विभागाने आज, 17 जून 2025 रोजी, 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सात जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात पावसाचा धडाका
कोकणात मान्सूनने जोर पकडला असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 17 ते 20 जूनदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर 18 जूनला मुसळधार पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 जूनला पावसाचा जोर कमी होईल, पण नागरिकांनी रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी.
मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर 17 ते 20 जूनदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. दरड कोसळणे आणि पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे. पुणे शहर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या मैदानी भागांत आज मध्यम पाऊस, तर 18 ते 20 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडेल. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये 17 जूनला मध्यम पाऊस, त्यानंतर तुरळक सरींची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरला हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती
धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये 17 ते 20 जूनदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये 20 जूनला वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा आहे.
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत आज जोरदार पाऊस पडेल. 18 ते 20 जूनदरम्यान पावसाचा जोर कमी होईल, पण मेघगर्जना आणि 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे कायम राहतील. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने नागरिकांना स्थानिक हवामानाची माहिती घेऊनच घराबाहेर पडण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ
Newsworldmarathi Pune: एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा आणि विचारधारेने चालणारी माणसे एकत्र येतात तेव्हा त्या संस्थेच्या माध्यमातून उत्तम समाजकार्य घडते. अशा संस्थांकडे मदतीचे हात येतात, लोकांचे पाय वळतात. अशी लोकांना एकत्र घेऊन जाणारी संस्था म्हणजे वसुंधरा फाऊंडेशन होय. वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून पंचतत्त्वातील पृथ्वी म्हणजेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य केले जात आहे ते गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ यांनी केले.
वसुंधरा फाऊंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वसुंधरा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी (दि. 16) आयोजन करण्यात आले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ममता सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ वक्ते श्याम भुर्के अध्यक्षस्थानी होते. वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले यांच्यासह राजेश दातार, आनंद सराफ, मोहन ठोंबरे, पियूष शहा, शिरीष मोहिते, उदय जगताप मंचावर होते.
प्रिया सावंत, शैलजा लोखंडे, स्नेहल जाधव, अजित माने, सुनील रोट्टी, मेधा जेरे, प्रसाद शिवरकर, विठ्ठल सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
समाजभान जपणाऱ्या व्यक्तींचा वसुंधरा फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे ही गोष्ट स्पृहणीय आहे, असे नमूद करून ममता सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारप्राप्त व्यक्ती अधिक जोमाने कार्यरत होतील. समाजाला त्यांच्याकडून अधिक विस्तृत स्तरावर कामाची अपेक्षा आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना श्याम भुर्के म्हणाले, वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य करणारी माणसे ही देवमाणसे आहेत. त्याग करून घर टिकवून ठेवणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आच, प्रेम, ममता वसुंधरा फाऊंडेशनच्या कार्यातून जाणवते. पुरस्काराच्या निमित्ताने वसुंधरा फाऊंडेशनने माणसातील चांगुलपणाची स्तुती, गौरव केला आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभंग, लोकसंगीत व स्फूर्तीदायी भक्ती-शक्ती शिवगीतांचा संगम असलेला कार्यक्रम अवधूत गांधी आणि सहकाऱ्यांनी सादर केला.
मान्यवरांचे स्वागत धनंजय भोसले, ॲड. मनिषा भोसले, उदय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज देशपांडे, शिल्पा देशपांडे यांनी केले. सुरुवात ॲड. मनिषा भोसले यांनी ‘असेच एक झाड होऊया’ ही स्वरचित कविता सादर केली. मोनिका गोखले यांनी नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली.
कै. श्रीकांत भडके विद्यालयात मा. नगरसेवक श्रीकांत भीमाले यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…
Newsworldmarathi Pune: संदेश नगर येथील कै. श्रीकांत भडके प्राथमिक विद्यालय, शाळा क्र. 105 मध्ये आज शाळा प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगरसेवक श्रीकांत भीमाले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी भीमाले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळेचा पहिला दिवस म्हणजेच नव्या ज्ञानयात्रेचा शुभारंभ असतो. नवीन पुस्तकांचा सुवास, टवटवीत दप्तर, वॉटरबॅग आणि शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह पाहून, “माझे शाळेचे दिवस आठवले,” अशा भावना श्रीकांत भीमाले यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटण्यात आली. यावेळी पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले कोथरूड मधील विद्यार्थ्यांचे स्वागत…
Newsworldmarathi Pune: आज लहानग्यांचा शाळेतला पहिलाच दिवस ! याच औचित्याने लहानग्यांच्या स्वागतासाठी कोथरूड येथील पुणे महापालिकेच्या पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पुणे महापालिकेच्या शाळेत हजारो मुलं-मुली शिक्षण घेतात. माझंही या शाळांशी वर्षानुवर्षे भावनिक नातं कायम आहे. आयुष्याची वाट काहीशी खडतर असताना ज्ञानगंगेच्या लाटेवर स्वार होणारे हे विद्यार्थी नव्या उमेदीने शैक्षणिक वाटचाल सुरु करतात, हे निश्चितच समाधान देणारे असते, असे केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
यावेळी ना. नगरसेवक दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, पुनीत जोशी, बापू मानकर, कुलदीप सावळेकर, नीलेश कोंढाळकर, प्रशांत हरसुले, मंदार बलकवडे, प्राची बगाटे, अपर्णा लोणारे यांच्यासह शाळेचे शिक्षक आणि पालकांनी उपस्थित होते.
आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसे, पण पूल दुरुस्तीसाठी नाही?’ संजय राऊतांचा अजित सरकारवर हल्लाबोल
Newsworldmarathi Mumbai: Pune Maval bridge collapse : पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत.
यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीपात्रात उतरले आहे. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह तीव्र झाल्याने बचावकार्याला मोठे आव्हान आहे. या दुर्घटनेवरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधत पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र डागलं. अजित पवार या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का? असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात नवीन सरकार आल्यापासून सातत्याने अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरु आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या. मावळमधल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या अपघातात नक्की किती लोक मृत्यू पावले आहेत याचा खरा आकडा समोर आलेला नाही. कित्येक लोक वाहून गेले, असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांना गर्व आणि अहंकार
पुढे बोलताना म्हणाले, आपण विकासाच्या गोष्टी करता. त्या जिल्ह्याचे अजित पवार हे पालकमंत्री आहेत. त्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार आहे. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहात का? एक दोन कोटींचा पूल पालकमंत्री उभा करु शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान कामात झोपलेले असतात. मोठ्या बिल्डरांची ठेकेदारांची कामे यात ते जागे असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.
तसेच या पुलासाठी कागदावर पैसे मंजूर झाल्याचे म्हटलं जातंय. मग पूल का नाही झाला? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मते विकत घ्यायला, आमदार खासदार विकत घ्यायला, लाडक्या बहिणींची पैसे विकत घ्यायला पैसे मिळतात. पण लोकांचे बळी गेलेला पूल दुरुस्त करायला पैसे नाहीत, असा संतप्त सवल राऊत यांनी केला.
दि ऑर्डन्नस फॅक्टरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी पद्मश्री मिलिंद कांबळे यांची निवड
Newsworldmarathi Pune: दि ऑर्डन्नस फॅक्टरी एम्प्लॉइज एज्युकेशन सोसायटीच्या (रेंजहिल्स सेकंडरी स्कूल ग्रुप) च्या अध्यक्षपदी आय आय जम्मू चे अध्यक्ष व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांची निवड झाली .आज त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे पुष्प व खाऊ देऊन स्वागत करीत अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
रेंजहिल्स स्कूल चा येत्या वर्षभरात कायापालट करणार असे आश्वासन पद्मश्री मिलिंद कांबळे त्यांनी यावेळी दिले.नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी कोरा कॅनव्हांस आहे .त्यावर कुंचल्याने आयुष्याची स्वप्ने ,आवड आणि निर्धार रंगवण्यासाठी आपल्या संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक व आम्ही सज्ज आहोत असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी दिला.
संस्थेच्या रेंजहिल्स इंग्लिश स्कूलचा च्या मुख्याध्यापिका अमृता ग्रोवर व रेंजहिल्स सेकंडरी स्कूल च्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी भुजबळ यांनी पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे स्वागत केले.
खडकी एम्युनेशन फॅक्टरी च्या कर्मचारी व परिसरातील वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे .या संस्थेची स्थापना 1966 साली करण्यात आली.
आपल्या या संस्थेला लवकरच विविध उपक्रम राबवून अतिशय अद्ययावत सर्व सुविधा युक्त शाळा पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनातून करणार असून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आता आपली संस्था अतिशय गतीने काम करणार असल्याचे संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळवे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले .
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप,सहसचिव राजेंद्र साळवे ,संचालक गौतम भोसले ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अमृता ग्रोव्हर व मराठी माध्यमाच्या प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी भुजबळ ,प्री प्रायमरी च्या मुख्याध्यापिका सोनम जाधव ,मुख्याध्यापक सोमनाथ बोभाटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते .
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत…
Newsworldmarathi Pune : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतकरण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी
प्रवेशद्वार रांगोळ्या व फुलमाळांनी सजवले होते.
इयत्ता पाचवीच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना शासनाच्या डायटच्या अधिकारी श्रीमती वसुधा शिंदे यांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले.शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून शाळेत विविध विषयांचे अध्ययन कशासाठी करायचे याची माहिती स्वरचित गीत गायनातून विद्यार्थ्यांना दिली व ते गीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले.
मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘चंदर आणि इतर कथा ‘ या गोष्टीच्या पुस्तकाचे प्रकाशन या निमित्ताने करण्यात आले. शालासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर व प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.विजय देवळणकर यांच्या हस्ते बाल विद्यार्थ्यांच्या समावेत हे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकातील चंदर या गोष्टीचे कथन रवींद्र सातपुते यांनी केले.पाचवीतील विद्यार्थी अबीर पाटणकर याने या पुस्तकाचे परीक्षण सादर केले.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अंजली गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर रवींद्र सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.
डी ई एस शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत…
Newsworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये शाळा सुशोभीत करून तसेच खाऊ देऊन नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या गणेश सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्णा बोरकर यांनी ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक विकास पढेर यांनी केले. योगेश पाटील यांनी शाळेबद्दलची चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना शाळेची माहिती करून दिली. शालेय पदाधिकाऱ्यांचा आणि शिक्षकांचा परिचय मनीषा जाधव यांनी करून दिला. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शालेय क्रमिक पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापिका सुनीता राव यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून आदर्श मनुष्य घडवण्यासाठी शाळा कशा प्रकारे प्रयत्न करते याबद्दल विचार सुनीता राव यांनी मनोगतामध्ये मांडले. या कार्यक्रमामध्ये इयत्ता सहावी मधील निखिल भुजबळ याने याच शाळेमध्ये प्रवेश घेण्याची पूर्वीपासूनची इच्छा होती, अशी भावना व्यक्त केली. पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील उपक्रमांमध्ये तसेच खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकांनी विद्यार्थ्यांना केले.
क्रमिक पुस्तकांच्या वाटपाची व्यवस्था काशीनाथ घोडे यांनी पाहिली. सर्वांचे आभार गीतांजली जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी देविदास झोडगे यांनी केले. स्टेज सजावट डॉ. रूपाली माळी यांनी केली. या कार्यक्रमाची छायाचित्रण व्यवस्था डाॅ. अरुण डेंगळे यांनी पाहिली. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार उपस्थित होते*
शाळेचा पहिल्या दिवशी छोटा व मोठ्या गटाचे स्वागत केले. मुलांचे स्वागत फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या इत्यादीने केले. तसेच प्ले ग्रुप व मिनी केजी मुलांसाठी शाळेतील पालक व शिक्षणविवेक मार्फत पपेट शो सादरीकरण केले.जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ होतो.
मुलांना शाळेची गोडी लागावी. त्यांचा शाळेचा पहिला दिवस कायम आठवणीत रहावा म्हणून टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत नाविन्यपूर्ण मुलांचे स्वागत केले.
शिक्षिकांनी ढोल, लेझीमचा गजर केला. शाळेतील काही मुले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, आपटे आणि शाहू महाराज यांच्या वेशभुषेत आली होती. शाळेच्या आवारात सौ.निशा जोशी यांनी मंत्रोच्चारात अग्निहोत्र केले. शाळा पुर्ण सजविण्यात आली होती. प्रत्येक वर्गात मुलांना अष्टगंध लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. बालगीते लावून त्यांचे स्वागत केले. मुलांनी आपल्या पालकांसोबत अग्निहोत्र आणि सरस्वतीचा आशिर्वाद घेतला. शाळेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री ठकार आवर्जून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी मुलांचे, पालकांचे स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा पहिला दिवस उत्साहात, आनंदात पार पडला.
तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज पासून सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी शाळेचा श्री गणेशा केला. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता विद्यार्थ्यांचे औक्षण करून सनईच्या मंजुळ नादातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीला वंदन करून सरस्वतीचा आणि सर्व शिक्षकांचा आशीर्वाद घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ केला.bयावेळी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख उपस्थित होत्या.
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दोन हजार पोलिसांचा ताफा
Newsworldmarathi Pune : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होत असून, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलिस ठाण्याने यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके असे जवळपास २ हजार मनुष्यबळ सोहळ्यासाठी मागविले आहे. आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी ही माहिती दिली.
सोमवारी हा बंदोबस्त दाखल होणार असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नागरिकांनी तत्काळ पोलिस मदतीसाठी ११२ नंबर डायल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्थान सोहळा कालावधीत दि. १७ ते २० यादरम्यान आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे.
यामुळे मंगळवार (दि. १७) पासून शहरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. स्थानिक तसेच भाविकांना आपली वाहने शहरात स्वत:च्या घरी नेता यावीत, यासाठी आळंदी देवस्थान व आळंदी पोलिस प्रशासनाने संयुक्त बैठक घेत स्थानिक नागरिकांना पास उपलब्ध करून दिले आहेत. पालखीचे प्रस्थान गुरुवारी (दि.१९) होणार असून, या दिवशी गुरुवार असल्याने माउली पालखीची सूर्यास्तानंतर नित्य गुरुवारची पालखी प्रदक्षिणा होत असते.
कडक पोलिस बंदोबस्त
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून ७ सहायक पोलिस आयुक्त, ४२ पोलिस निरीक्षक, १६४ पोलिस उपनिरीक्षक, १ हजार ३४० पोलिस अंमलदार,६०० होमगार्ड, असा बंदोबस्त नेमण्यात येणार असून, एसआरपीएफच्या २ कंपन्या, एनडीआरएफची एक तुकडी आणि बीडीडीएसची २ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत.
आनंददायी शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ग्वाही
Newsworldmarathi Pune: विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटावी यासाठी कृतीयुक्त आनंददायी शिक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक कलानुसार करिअरसाठी आवडीचे कौशल्य विकास शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
बिबवेवाडीतील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात ‘शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमा’च्या निमित्ताने, विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना मिसाळ बोलत होत्या. सहाय्यक शिक्षणप्रमुख सुभाष रावत, जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका शोभा घोडे आणि मुख्याध्यापिका आरती पोळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “आजपासूनच राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात क्रांतिकारी बदल होत आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गाणी, गोष्टी, कोडी, नाटक, चित्रकला, प्रकल्प यांचा शिक्षणात समावेश असेल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.”

