युजर चार्जेसविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांचा एल्गार
Newaworldmarathi Pune :कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास १३ जूननंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.
दि पूना मर्चंट्स चेंबर येथे रविवारी आयोजित राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, दि ग्रेन राईस अँड ऑईल सीड्स मर्चंट्स असोसिएशन आणि दि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने या परिषदेचे आयोजन केले होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये २८ फेब्रुवारी २०२२ पासून येणाऱ्या अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल व अनुषंगिक मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर प्रति १०० रुपये व्यवहारामागे एक रुपया युजर चार्जेस आकारण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. या शुल्काचा भार अखेरीस सर्वसामान्य ग्राहकांवर पडून वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याची भीती परिषदेत व्यक्त करण्यात आली.
परिषदेत राज्यातील कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, जयसिंगपूर, नाशिक, बारामती, अहिल्यानगर, सोलापूर, मुंबई, वाशी, नागपूर, मोर्शी, धुळे आदी भागांतील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित होते, तर ऑनलाइन माध्यमातून राज्यभरातील विविध संघटनांच्या सुमारे २५० पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, ‘फाम’चे अध्यक्ष जितेंद्र शाह, ‘कॅमेट’चे दीपेनजी अग्रवाल, ‘ग्रोमा’चे अध्यक्ष भीमजीभाई भानुशाली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, पोपटलाल ओस्तवाल, राजेश शाह, सुरेश चिक्कली, प्रफुल्ल संचेती, सचिन निवुंगणे, संभाजी किरटे, अमोल शाह, शब्बीर शाह, राजेंद्र बोथरा आदींनी आपली मते मांडली.
परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांमध्ये युजर चार्जेस कायदा तातडीने रद्द करणे, जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याऐवजी नव्या परिस्थितीनुरूप कायदा तयार करणे, २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करणे, तसेच पारंपरिक व्यापार टिकवून ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणे या मागण्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बाठिया यांनी केले. स्वागत इंद्रेश नहार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आशीष दुगड यांनी मानले.
“भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आश्रयाशिवाय अवैध दारू व्यवसाय शक्य नाही”; रोहन सुरवसे-पाटील यांचा आरोप
Newaworldmarathi Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, या संपूर्ण रॅकेटला राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हडपसर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत विषारी हातभट्टी दारू सेवन केल्याने सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट निर्माण झाली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली, तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
अशा सराईत आरोपींकडून शहरातील विविध भागांत खुलेआम अवैध दारूची निर्मिती आणि विक्री सुरू होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमका काय करत होता, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसाय सुरू राहू शकत नाही, असा आरोप सुरवसे-पाटील यांनी निवेदनात केला आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
आवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” अंतर्गत “५ न्याय अभियान” राज्यभर युवक काँग्रेस राबविणार
Newaworldmarathi Pune : भारतीय युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने “आवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” तसेच “५ न्याय अभियान” राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
देशभरातील विविध शहरांमध्ये वाढत्या नागरी समस्या, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरातील पाणी, वीज, रस्ते, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण या प्रश्नांवर युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध स्तरांवर आंदोलन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील विविध कामगार घटकांच्या प्रश्नांवर “५ न्याय अभियान” अंतर्गत स्ट्रीट व्हेंडर्स, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, घरगुती कामगार आणि ऑटो-रिक्षा चालक यांच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र मोहिमा राबविण्यात येणार आहेत. रेहडी-पटरी विक्रेत्यांवरील कारवाई, कथित वसुली, PF-ESI अंमलबजावणी, किमान वेतन, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंदी, सुरक्षा साधने, घरगुती कामगारांना कायदेशीर दर्जा, ई-चलान, अॅप कंपन्यांची मनमानी, वाढते इंधन दर, पार्किंग आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस राज्यभर आवाज उठविणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने या अभियानांतर्गत नागरिक संवाद यात्रा, विभागनिहाय बैठक, निवेदन मोहीम, सोशल मीडिया जनजागृती आणि विविध जनआंदोलने राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “शहर चालवणाऱ्या असंघटित कामगारांना आजही मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळत नाही. ‘५ न्याय अभियान’ हे केवळ आंदोलन नसून शहरातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेसचा व्यापक संघर्ष आहे.”
ज्येष्ठ नेते मोहन जोशी म्हणाले, “पुण्यासारख्या वाढत्या शहरांमध्ये नागरी प्रश्न गंभीर बनले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर सरकार आणि प्रशासनाला उत्तरदायी धरण्यासाठी युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सचिव शांभवी शुक्ला, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, इंटक अध्यक्ष चेतन अग्रवाल, बाळासाहेब आमराळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस व संघटन सचिव प्रवीण कुमार बिराजदार, माध्यम प्रमुख अक्षय जैन, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, अभिषेक अवचार, स्नेहल देशमुख, विश्वजीत जाधव आदी उपस्थित होते.
व्यवसायवाढीसाठी मित्राला केलेली मदत आली अंगाशी; 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन सुगनलाल सेठीयावर गुन्हा दाखल
Newaworldmarathi Pune : एकाच सोसायटीत रहात असल्याने ते चांगले मित्र झाले. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी तीन महिन्यांच्या मुदतीने ३५ लाख रुपये मित्राला दिले. मात्र, मित्राला मदत करणे त्यांच्या अंगाशी आले. तीन महिन्यानंतर मित्र उलटून पडला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संजय धनराज कटारिया (वय ६४, रा. कुमार सिद्धाचल, बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन सुगनलाल सेठीया Nitin Suganlal Sethia (वय ६१, रा. ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे. (Cheating Fraud Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कटारिया याची स्वतःची निरगुडसर येथे ८ एकर बागायती शेती आहे. शेती व्यतिरिक्त त्यांचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. नितीन सुगनलाल सेठीया यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. दोघे एकाच कॉलनीत रहात असल्याने ते मित्र झाले. दोघांची चांगली ओळख असल्यामुळे सेठीया यांना बांधकामासाठी पैशांची गरज असल्याने तसेच बांधकामाचा धंदा वाढविण्यासाठी त्यांनी कटारिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. २०२५ मध्ये त्यांनी तीन चेकद्वारे सेठीया यांना ३५ लाख रुपये दिले. बांधकामासाठी तीन महिन्यानंतर परत देण्याचे आश्वासन सेठीया यांनी दिले होते.
कटारिया हे सेठीया यांना चांगले ओळखत असल्याने त्यांनी विश्वासाने पैसे दिले होते. तीन महिन्यांची मुदत निघून गेल्यानंतर त्यांनी सेठीया यांच्याकडे वारंवार फोनद्वारे संपर्क करुन पैशांची मागणी केली. तेव्हा प्रत्येक वेळी सेठीया यांनी उडवा उडवीची उत्तरे देत असत. तीन महिन्यांच्या बोलीवर पैसे दिले असताना त्यानंतर अनेक महिने झाल्यानंतरही सेठीया यांनी अद्याप काहीही पैसे परत केले नाही. शेवटी कटारिया यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
रवींद्र धंगेकरांचा तलाठी भाचा लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात..!
Newaworldmarathi Pune: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावचा तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला तलाठी हा पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाचा असल्याचे समोर आले आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर तक्रारदार आणि त्यांच्या भावाचे नाव लावण्यासाठी ही लाच मागण्यात आली. बहीण आणि भावामध्ये हक्कसोड पत्र झाल्यानंतर त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी राणे याने एकूण १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती.
राणे याने यापूर्वीच १ लाख रुपये स्वीकारले होते आणि उर्वरित २५ हजार रुपयांसाठी तक्रारदाराकडे तगादा लावला होता. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, राणे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी माण येथील तलाठी कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी २५ हजार रुपये स्वीकारताना संतोष राणे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संजय मयेकर यांना पीएच. डी. जाहीर
Newaworldmarathi Pune : संजय रविकांत मयेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मयेकर यांनी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातून ‘पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील योजनांचा अभ्यास’ या विषयावर संशोधन करत आपला शोधप्रबंध सादर केला होता. शिक्षण क्षेत्रातील विविध योजना, त्यांची अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यांचा त्यांनी आपल्या संशोधनामध्ये सखोल अभ्यास केला आहे.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. गायत्री चौकडे यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मयेकर यांनी हे संशोधन पूर्ण केले.
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संजय मयेकर यांच्या या यशामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वंजारी समाजाचा भव्य वधू-वर सूचक स्नेह मेळावा रविवारी
Newsworldmarathi Pune: विठ्ठल रुक्मिणी सेवा प्रतिष्ठान व मा. पै. श्री. मोहन (आप्पा) वणवे युवा मंच यांच्या वतीने वंजारी समाजाचा भव्य वधू-वर सूचक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत तीर्थक्षेत्र भक्तिधाम, टॉम्स कंपनी शेजारी, मुंढवाडी, मुंढी (जि. पुणे) येथे होणार आहे.
समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा तसेच समाजामध्ये एकोपा आणि संवाद वाढावा, या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पोलीस प्रशासनातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
मेळाव्याचे मुख्य आयोजक मा. पै. श्री. मोहन (आप्पा) वणवे असून त्यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
या मेळाव्यात वधू-वर परिचय, संवाद तसेच समाजातील विविध विषयांवर चर्चा होणार असून युवक-युवती आणि पालकांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे. समाजातील ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पाणीपट्टी थकबाकीसाठी अभय योजना राबवा: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी
Newsworldmarathi Pune: महापालिकेकडे मार्च २०२६ अखेर पाणीपट्टीची अंदाजे ८०० कोटी रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी अभय योजना राबवावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला असून, तो प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे.
शहरात नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत, तसेच आधुनिक सुविधा या प्रामुख्याने पुणेकरांकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या निधीतून उभारल्या जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील पाणीपट्टी थकबाकीची वसुली होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मिळकतकर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून अभय योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर पाणीपट्टीसाठी योजना लागू केल्यास थकबाकीदार नागरिकांना दिलासा मिळेल आणि मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन वसूल झालेला निधी शहराच्या शाश्वत विकासासाठी उपयोगात आणता येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकहिताच्या कामातून जनतेला दिलासा; छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्न
Newsworldmarathi Pune: सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामांना गती मिळावी तसेच विविध शासकीय योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले *छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर* उत्साहात व नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरामध्ये फेरफार, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड दुरुस्ती, मतदान नोंदणी, आरोग्य सेवा, शासकीय योजना मार्गदर्शन, बँक खाते उघडणे, डीबीटी सेवा, रेशन कार्ड संबंधित कामे, पाणीपुरवठा आदी विविध सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला. अनेक नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास लोकप्रिय आमदार मा. श्री. सिद्धार्थदादा शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नगरसेवक रविंद्र सळेगावकर, नगरसेविका पूजाताई जागडे, नगरसेविका अमृताताई म्हेत्रे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, योगेश बाचल, गणेश बगाडे, सुरेश शिंदे, विकास डाबी व सोमनाथ भोसले यांची उपस्थिती लाभली.
नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवत आवश्यक मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका व स्थायी समिती सदस्य निशा सचिन मानवतकर व सचिन मानवतकर यांनी केले होते. जनतेच्या सेवेसाठी अशाच लोकहिताच्या उपक्रमांद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दहावीच्या निकालात चाटे शिक्षण समुहाचा पुन्हा एकदा विजयाचा डंका!
Newaworldmarathi Pune : फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीही चाटे शिक्षण समुहाचा निकाल 100% लागला असून चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
आज सकाळी दहावीचा निकाल 11:30 वा.घोषित झाल्यानंतर लगेच सायंकाळी ठिक 05:00 वा.चाटे शिक्षण समुहाने चाटे कोचिंग क्लासेस व चाटे स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा रोड बालाजी नगर शाखेवरती सत्कार समारंभ आयोजित केला होता.यावेळी अतिथी म्हणून चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात अतिथी च्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रा.फुलचंद चाटे सोबत सौ.वैशालीताई चाटे,पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा.विजय बोबडे व गुणवंत विद्यार्थ्यी,पालक उपस्थित होते.सत्कार समारंभाच्या तत्पूर्वी चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे यांनी फोनद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांच्या हस्ते यशाचे मानकरी श्रेयसी गायकवाड ९९.२०% दर्श निकम ९९.२० % आर्या जोशी ९८.६०% स्वराली कर्डिले ९८.२०% श्रावणी निंबाळकर ९७.६०% तनु हरमलकर ९७.४०% शाश्वती पवार ९७.६०% वर्धा टिकोले ९७.००% वेदांत डोंगरे ९६.८०% स्वस्ति गायकवाड ९६.८०% आर्या शेवाळे ९६.४०% सोहम टकले ९६.२०% संस्कृती फडके – ९६.२०% प्रांजली पेटकर – ९५.६० % प्रज्ञा ओव्हाळ ९५.४०% पूर्वा शहा ९५.३०% सिद्धी पाटील – ९५.२०% अनुष विश्वकर्मा ९५.००% दिव्या काटेकर ९५.०० % प्रसन्न देशमुख ९४.८०% आदी कणसे ९४.८०% रोहन पुण्ये – ९४.६०% प्रथमेश रंगापुरे ९४.६०% प्रियांशी देशमुख ९४.६०% अक्षरा शिंदे ९४.४०% सार्थक मासकर ९४.२०% अनुजा खोत ९३.८०% भूमी पाटील ९३.८०% आर्या पाटील ९३.४०% सम्यक बनसोडे ९३.२०% कोमल लिंगायत – ९३.२०% प्रगती गमे ९२.८०% वैभव राठोड ९२.६०% अथर्व नागापुरे ९२.६०% माधव आळंदकर ९२.६०% रौनीत यादव ९२.४०% आर्सालन शेख ९२.४०% शिवांजली जाधव ९२.४०% रजनीशा शर्मा ९२.२०% आदित्य सोलवणे ९२.००% श्रेया बिलंबे ९१.८०% विहान ढमाले – ९१.६० % अर्णव माठे ९१.६०% रुहेक्षा कपिले ९१.४०% अपेक्षा मुंढे ९१.४०% प्रतीक घरजाळे ९१.२०% रेवती रावलू ९१.२०% वैष्णवी जव्हेरी ९१.००% कटारिया आयुष : ९०.६०% अनुष्का चव्हाण ९०.२०% अथर्व कदम ९०.२०% रुद्र यादव – ९०.००% जयदीप देसाई ९०.००% साक्षी हेळकर ९०.००% सारंग मारकड ९०.००% यांचा सत्कार केला.
सोबतच वर्षभर मेहनत घेतलेल्या शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते.पालकांनी ही आपले वैयक्तिक मनोगत असे व्यक्त केले की,चाटेचा पॅटर्न सक्सेसफुल झाल्यामुळेच आमच्या पाल्याचा निकाल उत्तम लागला आणि स्वप्नाची सुरूवात छान झाली.त्यानंतर चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना अभिनंदन करून दहावी नंतर पुढे काय? याबद्दल मार्गदर्शन केले की,आजचे हे सक्सेस हे एक-दोन दिवसांचे नसून नववी पासूनच शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आहे व तुमच्यासारख्या पालकांनी दिलेली प्रेरणा आहे.
त्यामुळे चाटे पॅटर्न आज फलित ठरला आहे.आजच्या निकालावरती न थांबता लगेच पुढचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अकरावी-बारावी नंतर च्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला सर्वानी तयारीला लागणे गरजेचे आहे.कारण दहावीच्या परीक्षेपेक्षा जेईई,नीट,सीईटी,एनडीए अशा उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो.अकरावी व बारावी साठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराजवळील आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते अशाठिकाणी अकरावी सायन्स चा प्रवेश घेणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणतात म्हणून नव्हे तर आपल्या आवडीनुसार विषय व दिशा ठरवा.प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात पुढे जायचे असेल तर आपण काय करणार आहोत हे अगोदर निश्चित केले पाहीजे.
त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखा स्वत: मधील गुण ओळखा सकारात्मक विचार करा.स्वप्न साकार करण्यावर भर द्या वेळ कोणासाठी थांबत नाही त्यासाठी परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच दोन वर्ष अभ्यास करा प्रत्येक दिवस आपला आहे असं समजून तयारीला लागा यश तुमचेच आहे कारण तुमच्यासोबत चाटे शिक्षण समूह आहे चाटे शिक्षण समूह आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि अकरावी बारावी सह जेईई नीट सीईटी एनडीए यासारख्या परीक्षा याबाबत ही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.
सत्कार समारंभ प्रसंगी चाटे स्कूल च्या प्राचार्या नवनीत राजपाल प्राचार्य रणजीत जगताप, प्राचार्य नामदेव माने,गौरव राऊत,प्रशांत जाधव,चाटे स्कूल अँण्ड ज्यू.कॉलेज समन्वयक रत्नाकर सोनवणे अनंत इंगळे ऋषिकेश अहिरराव, प्रकाश खारतोडे,विष्णु पालवे,प्रविण जावळे,श्रीमती सुवर्णा कुलकर्णी व इतर शाखा व्यवस्थापक आदी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत इंगळे यांनी केले तर रत्नाकर सोनवणे यांनी आभार मानले.

