प्रभाग 41 मध्ये राष्ट्रवादीच्या निवृत्ती आण्णा बांदल यांचा विजय; शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांना पराभवाचा धक्का
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव झाला आहे. या प्रभागातील निवडणूक निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रभाग ४१ मध्ये समाविष्ट गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती बांदल आणि श्वेता घुले यांनी विजय मिळवला आहे. तर महंमदवाडी भागातून भारतीय जनता पक्षाचे अतुल तरवडे आणि प्राची आल्हाट हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी दोन जागांवर यश मिळवले असून शिवसेनेला मात्र अपेक्षित यश मिळाले नाही.
महंमदवाडी-उंड्री भागातील मतमोजणीला रात्री उशिरा सुरुवात झाली होती. सकाळपासूनच कार्यकर्ते एसआरपीएफ येथील मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. मतमोजणीला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांची चुळबुळ वाढली होती. मात्र हळूहळू निकाल स्पष्ट होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
आपल्या उमेदवारांचा विजय झाल्याची बातमी कानावर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दिसून आले. दीर्घ काळ चाललेल्या प्रचार, मेहनत आणि संघर्षाचे चीज झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा पराभव हा या निवडणुकीतील महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात असून आगामी काळात त्याचे पडसाद शहराच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामं हरली,पैसा जिंकला: आबा बागुल
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीतील निकाल हे अनपेक्षित असून आजवर केलेली विकासकामे हरली आणि पैसा जिंकला असेच म्हणावे लागेल अशा शब्दात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खंत व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी धक्कादायक पराभवानंतर बोलताना म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून काल मतदान होईपर्यंत सर्वत्र गोंधळ, तणाव,पैशाचा खेळ आणि सत्तेचा गैरवापर पाहायला मिळाला. सुज्ञ मतदार कुठेतरी या प्रकारांना आळा घालतील असा विश्वास होता.पण शेवटी पैसाच मोठा झाला.
मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. वॉर्ड असो प्रभाग रचनाही बदलून मी निवडून आलो ते केवळ विकासकामांच्या जोरावर ;पण यंदा सातव्यांदा निवडणुकीला सामोरे गेलो मात्र जो पराभव पत्करावा लागला तोच मुळात अनपेक्षित तर आहे. शिवाय सत्ताधारी कोणतेही षडयंत्र रचू शकतात यावरच शिक्कामोर्तब झाले आहे.
सत्तेचा गैरवापर, यंत्रणांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणावर पैशाचा पाऊस पाडून विकासाला बगल देण्याची खेळी यशस्वी झाली हे लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे.वास्तविक मी ज्यावेळी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक जिंकली,त्यानंतर मी सातत्याने विकासकामांवर भर दिला. मात्र यंदा जो पराभव झाला आहे,तो अनपेक्षित असल्याचे नमूद करताना आबा बागुल यांनी विकासकामांवर विश्वास ठेवून मला ज्या सुज्ञ मतदारांनी मतदान केले त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.
पुण्यात काँग्रेसचा दणदणीत विजय; प्रशांत जगताप यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा केला पराभव
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला दिलासा देणारा निकाल समोर आला असून, प्रभाग क्रमांक १८ ‘ड’ मधून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. या विजयासह पुण्यात काँग्रेसने आपले खाते अधिकृतपणे खोलले असून, प्रशांत जगताप यांनी पक्षासाठी महत्त्वाचा विजय खेचून आणला आहे.
या प्रभागात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून, त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र मतदारांनी हा निर्णय नाकारत काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांना कौल दिला.
प्रभाग १८ ‘ड’ मध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत चढ-उतार सुरू असताना अखेर प्रशांत जगताप यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या निवडणुकीत प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पराभवाच्या दिशेने असल्याचे चित्र दिसत आहे. तरीही प्रशांत जगताप यांच्या विजयाने प्रभाग १८ ‘ड’ मध्ये काँग्रेसने भाजपविरोधात ताकद दाखवून दिली आहे.
या निकालामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी काळात काँग्रेसला याचा राजकीय फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोंढवा- येवलेवाडीत बोगस मतदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत; निवडणूक पारदर्शक व्हावी उदयसिंह मुळीक यांची मागणी
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकांदरम्यान कोंढवा–येवलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आजही सुरू आहे. त्या काळात मतदार यादीत बाहेरील व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचे तसेच वास्तव्यात नसलेल्या नागरिकांची नोंद आढळल्याचे आरोप स्थानिक पातळीवर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह मुळीक यांनी केली आहे.
कोंढवा–येवलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक संघटना आणि जागरूक मतदारांनी पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादी तपासणीसह सर्व प्रक्रिया काटेकोरपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मतदार नोंदणी, पत्त्यांची पडताळणी, तसेच संशयास्पद नोंदींची सखोल चौकशी करण्यात यावी, असे मत नागरिकांचे आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, अन्यथा लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घ्याव्यात, अशी सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचा धडाका; तब्बल १०९ उमेदवारांच्या प्रचारात मोहोळ प्रत्यक्ष सहभागी
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. या संपूर्ण प्रचारकाळात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे महापालिका निवडणुकीतील भाजपाचे ‘कॅप्टन’ मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात अक्षरशः प्रचाराचा धडाका उडवला. तब्बल २७ प्रभागांचा प्रत्यक्ष दौरा करत १०९ उमेदवारांच्या प्रचारात ते स्वतः मैदानात उतरले आणि पदयात्रा, बाईक रॅली, मतदारांशी गाठीभेटी, कॉर्नर सभा यांमधून संपूर्ण पुणे ढवळून काढले.
या प्रचारादरम्यान मोहोळ यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा, पायाभूत सुविधांचा आणि पुण्याच्या बदलत्या चेहऱ्याचा प्रभावीपणे आढावा मतदारांसमोर मांडला. ‘ट्रिपल इंजिन सरकार’मुळे पुण्याला मिळालेली मेट्रो, रिंग रोड, नदी पुनरुज्जीवन, २४ तास समान पाणीपुरवठा योजना, विमानतळाचे आधुनिकीकरण अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी पुण्याच्या भविष्यासाठी भाजपचाच पर्याय सक्षम असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणेकरांनी विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनाला पसंती दिली आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता भाजपाला या निवडणुकीत १२० ते १२५ जागा मिळतील आणि पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, याबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आगामी काळातही मिळणार आहे.”
संपूर्ण प्रचारकाळात मोहोळ यांनी सामान्य नागरिकांपासून व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीवासीय, आयटी कर्मचारी अशा विविध घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक विकास या प्रमुख मुद्द्यांवर भाजपची ठोस भूमिका त्यांनी मतदारांसमोर स्पष्ट केली.
पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपने विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वाचे मॉडेल मांडले असून मोहोळ यांच्या आक्रमक, नियोजित आणि लोकसंपर्काधारित प्रचारामुळे शहरभर भाजपचा आत्मविश्वास आणि सकारात्मक वातावरण दिसून आले.
मोहोळ पुढे म्हणाले की, भाजपने संपूर्ण प्रचारकाळात सकारात्मक व विकासकेंद्रित मुद्द्यांवर भर दिला. प्रचाराची पातळी न घसरवता पुणेकरांच्या भविष्यासाठी ठोस अजेंड्यासह जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१७ नंतर ट्रिपल इंजिन सरकारमुळे पुण्यात विकासाला मोठी गती मिळाली असून मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक निकालानंतर कोणत्याही अन्य पक्षासोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत पुणेकरांच्या अपेक्षांनुसार भाजप स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात; एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १० पत्रकार परिषदांच्या माध्यमातून प्रचार
Newsworldmarathi Pune: मंत्री चंद्रकांतदादा महापालिका निवडणुकीत प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. १०० पेक्षा जास्त बैठका, घरोघरी भेटी ५० चौक सभांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी प्रचार केला. यामध्ये कोथरुड मधील चौक सभा ही लक्षवेधी ठरली.
राज्यातील २९ महापालिकांचा प्रचाराच्या तोफा आज थंडावला आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे होती. यावेळी पहिल्या दिवसापासून ना. पाटील यांचा प्रचारात सक्रिय सहभाग होता. वेळोवेळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा आणि १० पत्रकार परिषदा यामाध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी प्रचार केला.
या संपूर्ण काळातील कोथरुड मधील चौक सभा ही अतिशय लक्षवेधी आणि चर्चेत राहिली. कारण सभेसाठी कोणतीही व्यवस्था नसताना, गाडीच्या टपावर उभे राहुन त्यांनी नागरिकांना संबोधित केले होते.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे प्रभाग २५ मध्ये मोठा विजय होणार : राघवेंद्र बाप्पू मानकर
Newsworldmarathi Pune: गेल्या दहा दिवसांत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, घरोघरी पोहोचलेला प्रचार आणि नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात पुणे शहरातील सर्वात मोठ्या विजयाचा विश्वास भाजपाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आयोजित भव्य बाईक रॅलीदरम्यान ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद मोठी आहे. या ताकदीच्या जोरावर अवघ्या दहा दिवसांत पक्षाचे कार्यकर्ते घराघरांत पोहोचले. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे या प्रभागात पुण्यातील सर्वात मोठ्या विजयाचा आम्हाला विश्वास असल्याचे मानकर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीला माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले तसेच सर्व भाजपा बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाप्पू मानकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य बाईक रॅलीतून विजयाची चाहूल; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळांचा ठाम विश्वास
Newsworldmarathi Pune:
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज पार पडलेली भव्य बाईक रॅली ही केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून भाजपाच्या निश्चित विजयाची स्पष्ट नांदी असल्याचा ठाम दावा केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केला. रॅलीला मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरुणांचा प्रचंड जोश आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग पाहता १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्याच पारड्यात ४–० ने जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रॅलीदरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात, घोषणांच्या गजरात आणि कमळाच्या जयघोषात भाजपाच्या चारही उमेदवारांचे नागरिकांनी जाहीर स्वागत केले. या दृश्यांमधून मतदारांनी आधीच आपला कौल दिल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते.
“प्रभागातील चारही उमेदवारांना दिलेले प्रत्येक मत म्हणजे थेट पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे. हे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रभागाचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास घडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत,” असे स्पष्ट शब्दांत मोहोळ यांनी सांगितले.
भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर भर देताना ते पुढे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही व्यक्तिकेंद्री नव्हे, तर विचारकेंद्री राजकारण करणारी पार्टी आहे. भाजप विचाराने चालते, संस्कृतीने काम करते आणि निष्ठेने जनतेची सेवा करते. इथे कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पक्षातील प्रत्येक उमेदवार स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या विश्वासास पात्र आहे—हाच भाजपाचा खरा बळकटीचा आधार आहे.”
या रॅलीत तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभागातील एकूण वातावरण पाहता भाजपाच्या बाजूने स्पष्ट लाट निर्माण झाली असून विरोधकांसाठी ही स्थिती चिंताजनक ठरत आहे.
“विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपाचाच असणार हे जवळपास निश्चित आहे. प्रभाग क्रमांक ०९ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असून येथील मतदार नेहमीप्रमाणे कमळालाच मतदान करणार,” असा ठाम विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
एकूणच, आजच्या भव्य रॅलीतून प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपाच्या विजयाचे ठोस संकेत मिळाले असून, १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्या बाजूने ४–० ने झुकणार, असा स्पष्ट राजकीय संदेश संपूर्ण शहरात गेला आहे. त्यामुळे या प्रभागाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
झेडपी अन् 125 पंचायत समित्यांचं बिगुल वाजलं; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल
Newsworldmarathi Pune: झेडपी निवडणुकांसाठी 15 दिवसांची सुप्रीम कोर्टाने मुदत वाढ दिल्यानंतर आज (दि.13) राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर, 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केले जातील, राज्याचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तर, उर्वरित 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले. आयोगाच्या या घोषणेनंतर पुणे, सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
कोणत्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार ?
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदारांना दोनदा मतदान करावे लागणार असून, यासाठी 1 जुलै 2025 ची यादी वापरली जाणार असून, – नॉमिनेशन ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे. 3 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे.
लहुजी शक्ती सेनेचा आबा बागुलांसह शिवसेनेच्या पॅनेलला जाहीर पाठिंबा
Newsworldmarathi Pune:
लहुजी शक्ती सेनेचे विष्णूभाऊ कसबे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह संपूर्ण पॅनेलला जाहीर पाठिंबा दर्शवून विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाला भेट देत विष्णूभाऊ कसबे यांनी आबा बागुल यांच्याकडून प्रचाराचा आढावा घेतला.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे कार्य विकासाभिमुख असल्याने तसेच आबा बागुल यांचे आजवरचे कार्य हे लोकोपयोगी असल्याने लहुजी शक्ती सेना आबा बागुल यांच्यासह संपूर्ण पॅनेलला जाहीर पाठींबा देत असून संपूर्ण समाजाची ताकद आबा बागुल यांच्या पाठीशी असल्याचे विष्णूभाऊ कसबे यांनी सांगितले आणि विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहनही समाजबांधवांना केले.या पाठिंब्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चित वाढल्याची प्रतिक्रिया आबा बागुल यांनी यावेळी दिली.

