शालेय वाहनांची तपासणी मोहीम; वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आरटीओचे आवाहन

0
Newsworldmarathi Pune : नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने शालेय वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सोमवारी यासंदर्भात आदेश जारी करत वाहनधारकांना आपली वाहने तपासणीसाठी सादर करण्याचे आणि योग्यता प्रमाणपत्र तातडीने नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. आरटीओने स्पष्ट केले आहे की, शाळा आणि महाविद्यालयांमार्फत तसेच खासगी वाहनधारकांकडून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अशा सर्व वाहनांची तांत्रिक तपासणी करून त्यांना अद्ययावत फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वाहन तपासणीसाठी दिवे येथील आरटीओ कार्यालयात येऊन संबंधित वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे. तपासणीसाठी वाहनांची नोंदणी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, परवाना, फिटनेस अशा सर्व कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे. आरटीओने ही तपासणी प्रक्रिया साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वाहनधारकांना गैरसोय होणार नाही. त्यामुळे संबंधितांनी विलंब न करता लवकरात लवकर तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. ही मोहीम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.

असा लोकनेता पुन्हा होणे नाही…

0
Newsworldmarathi Team भाग्यश्री जाधव : आज, 3 जून 2025 रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील नाथ्रा गावात जन्मलेल्या मुंडेंनी कोणताही राजकीय वारसा नसतानाही संघर्षातून आपल्या वक्तृत्व, इच्छाशक्ती आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवले. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. ऊसतोड मजुरांच्या भागाचा विकास, भाजपला ग्रामीण भागात पोहोचवणे, आणि जनतेसाठी कायम लढा देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी भाजपला गावागावात नेले. शरद पवारांसारख्या नेत्यांविरुद्ध आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. फडणवीसांच्या राजकीय प्रवासातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वगुणामुळेच युतीला मजबुती मिळाली. 3 जून 2014 रोजी त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील एक तडफदार नेता हरपला. 2009 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून येत गोपीनाथ मुंडे यांनी दिल्ली गाठली. 2014 मध्येही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती केली. मात्र, 1990 ते 1995 हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा मानला जातो. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांविरुद्ध प्रभावी भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ट कौटुंबिक संबंध होते. त्यांनीच महायुती स्थापन करत रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी यांना एकत्र आणले.
Oplus_131072
मुंडे यांची राजकीय दृष्टी इतकी दूरगामी होती की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तरुण नेत्यावर त्यांनी विश्वास दाखवला. प्रमोद महाजन यांच्यासोबत त्यांनी फडणवीसांना कमी वयात आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं. 2013 मध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी गडकरी-मुंडे गटात रस्सीखेच सुरू होती. गडकरी गटाने सुधीर मुनगंटीवार यांना तर मुंडे गटाने फडणवीसांना पाठिंबा दिला. मुंडेंच्या ताकदीमुळे फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले आणि पुढे 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. गोपीनाथ मुंडेंचे राजकीय योगदान आजही भाजपच्या यशाच्या मुळाशी आहे आज, 3 जून 2025 रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात 12 डिसेंबर 1949 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कोणताही राजकीय वारसा नसतानाही, आपल्या प्रभावी वक्तृत्व, प्रबळ इच्छाशक्ती आणि जबरदस्त जनसंपर्काच्या बळावर त्यांनी राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले. गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर उच्चशिक्षण अंबाजोगाईतील महाविद्यालयात बी.कॉम. पर्यंत झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नाथ्राचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. 1978 मध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, तसेच भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदही भूषवले. 1985 मध्ये अपयश आलं तरी 1990 ते 2009 पर्यंत ते सलग आमदार राहिले. रेणापूर मतदारसंघ 2009 मध्ये नष्ट झाल्यानंतर त्यांनी परळीमधून यश मिळवले. ऊसतोड मजुरांच्या भागाचा विकास करणे, आणि भाजपसारख्या शहरकेंद्री पक्षाला ग्रामीण भागात पोहोचवणे, हे त्यांच्या कार्याचे मोलाचे योगदान मानले जाते. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला

राज्यात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय

Newsworldmarathi Nashik : राज्यातील शाळांमध्ये आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना बालवयातच रुजावी, देशप्रेमाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात केली. या निर्णयामुळे राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये बळावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) सदस्य, तसेच स्काऊट-गाईड्स यांची मदत घेतली जाणार आहे. राज्यात सध्या सुमारे 2.5 लाख माजी सैनिक आहेत, त्यांच्याच सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली. हे प्रशिक्षण शारीरिक शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि स्वयंशिस्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे मूल्य बिंबवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही विकसित होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. लवकरच यासंबंधीचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.

पुण्यात आणखी एका ‘वैष्णवी’चा बळी; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असताना, अशातच आता पुण्यात आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील धनकवडीमध्ये ३५ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वर्षा तुकाराम रणदिवे (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, वर्षाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तुकाराम रणदिवे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला बागाव (वय-५३), योगेश बागाव (वय-३५), वैशाली बागाव (वय-३२), सुवर्णा बागाव (वय-२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागाव आणि रणदिवे हि दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे शेजारी आहेत. उज्वला आणि तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली आणि सुवर्णा या अनेक दिवसांपासून वर्षा यांना टोमणे देऊन त्यांचा सतत छळ करत होत्या. सातत्याने होणार हा छळ असह्य झाल्याने वर्षा यांनी २४ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मृत्यूची नोंद केल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, याबाबत तपास केला असता आरोपींच्या छळाला कंटाळून वर्षा यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

पुण्यात महास्कॅम…! नारायण पेठेतील ज्वेलर्समधून कर्मचाऱ्याने लांबवले साडेचार कोटींचे दागिने

0
Newsworldmarathi Pune: शहरातील प्रसिद्ध सराफ बाजार असलेल्या नारायण पेठेतल्या नीलकंठ ज्वेलर्समध्ये मोठा अपहार उघडकीस आला आहे. दुकानात सेल्समन म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक नगरकर (३५, रा. कोथरूड) याने तब्बल चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने गुपचूप लंपास केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात रविवारी (१ जून) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वासघाताचं सोनं! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्मसन म्हणून काम करत होता. त्याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी या आभूषणांची विक्री करणाऱ्या दालनाची जबाबदारी होती. साधारणतः १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले. तपासासाठी पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. दोन हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या, तसेच दोन हजार ४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी (कॉइन) असा ऐवज चोरीस गेला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. एवढा ऐवज लंपास १८० सोन्याच्या वेढण्या – २,२६२ ग्रॅम ९४ सुवर्ण नाणी (कॉइन) – २,४२६ ग्रॅम एकूण अंदाजे ₹4.58 कोटींची चोरी पोलिसांची कारवाई सुरू नीलकंठ ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन डांगे (३७) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहे.

लग्नात सोने-गाडी दिलं, तरी नवऱ्याकडून फक्त वेदनाच ! सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ, महिला आयोगही मूग गिळून गप्प?

0
Newsworldmarathi Pimpri: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिंचवड येथे पत्रकार परिषद घेऊन ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी स्वतःच्या वैवाहिक आयुष्यातील छळ, मारहाण व पोलिस-प्रशासनाच्या उदासीनतेचा भडिमार करत धक्कादायक आरोप केले. लग्नात मोटार, १५ तोळे सोने आणि महागड्या वस्तू दिल्यानंतरही सासरच्यांनी सतत पैशांसाठी त्रास दिला, असा त्यांचा दावा आहे. या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार देऊनही त्याची दखल न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वडील अपंग असूनही सोने-गाडी दिलं : ऐश्वर्या हुलावळे ऐश्वर्या हुलावळे आणि त्यांच्या आई-वडीलांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. ऐश्वर्या हुलावळे यांनी म्हटले आहे की, आदित्य हुलावळे यांच्याशी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी भोसरीत लग्न झाले. सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक चारचाकी वाहन, १५ तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुख सुविधेच्या सर्व वस्तू दिल्या गेल्या. वडील ८१ टक्के अपंग असतानाही त्यांनी जमीन विकून वस्तू दिल्या. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी पती, सासू, दीर, आजोबा, मावस सासू, मावस सासरे यांनी छळ करण्यास सुरुवात केली. वारंवार होत असलेले अत्याचार, शिवीगाळ, धमक्या देत असल्याने अखेर या संदर्भात डिसेंबर २०१७रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यातही ‘तू जर तक्रार दाखल केली, तर आम्ही तुला नांदवणार नाही’, अशी धमकी सासरच्याकडून दिली गेली. भाजीमध्ये उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तक्रार अर्ज करूनही वेळोवेळी पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर २४ डिसेंबर २०१८ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद करताच ३ जानेवारी २०१९ रोजी मी माहेरी गेले. त्यानंतर पतीकडून घटस्फोट बाबत पत्र देण्यात आले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे मार्च २०२५ मध्ये तक्रार अर्ज केला. मात्र, त्यांच्याकडून अर्जाची दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलीस प्रशासनही मदत करीत नसल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे यांनी यावेळी केला. लग्नानंतर दोन महिन्यांतच छळ सुरू २८ फेब्रुवारी २०१७ रोजी भोसरीत ऐश्वर्यांचं लग्न झालं. सासरकडचं मागणं मान्य करून वडिलांनी जमीन विकून गाडी आणि १५ तोळे सोने दिलं.पण केवळ दोन महिन्यांतच माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरू झाला. पोलीस आणि महिला आयोगाकडूनही दुर्लक्ष! डिसेंबर २०१७ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. गुन्हा नोंदवला गेला २४ डिसेंबर २०१८ रोजी, पण तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष.मार्च २०२५ मध्ये महिला आयोगाकडेही अर्ज, पण काहीच कारवाई नाही, असा आरोप.

11th Class Admission : अकरावी प्रवेशासाठी ‘शेवटची संधी’! ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ; जाणून घ्या सविस्तर…

Newsworldmarathi Mumbai: इयत्ता ११ वी (वर्ष 2025-26) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३ जून ऐवजी आता ५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्राथमिक शिक्षण संचालक (माध्यमिक) श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. नोंदणीसाठी वाढीव मुदत कादिली? ६ मे रोजीच्या शासन निर्णयातील इन-हाऊस कोट्याबाबतच्या सुधारणा व ३१ मे रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, कनिष्ठ महाविद्यालये आणि त्यास जोडलेल्या शाळांच्या युनिट ठरवण्यात काही बदल झाले. या बदलांचा नीट विचार करून विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम सुधारण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इन-हाऊस कोट्याचे बदल नेमके काय? खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 10% जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित मुंबई, ठाणे, उपनगर क्षेत्रात एक युनिट – एक शाळा ग्राह्य राज्यातील इतर भागात – महसूली जिल्ह्यांनुसार युनिट निश्चित नोंदणीची आकडेवारी (२ जून २०२५ पर्यंत): विभाग नोंदणी संख्या मुंबई 2,65,900 पुणे 1,87,925 कोल्हापूर 1,07,012 नाशिक 1,12,108 छ. संभाजीनगर 1,00,040 नागपूर 95,210 अमरावती 98,359 लातूर 58,586 इतर 61,712 एकूण 10,85,851 विद्यार्थी महत्त्वाचे: विद्यार्थी आणि पालकांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. तांत्रिक अडचणींसाठी ई-मेल – support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन – 8530955564 वर संपर्क साधावा. नोंदणी व्यतिरिक्त पुढील टप्प्यांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

Sanjay Raut on Girish Mahajan : “गिरीश महाजन म्हणजे पक्षफोडाचा दलाल”; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

Newsworldmarathi Mumbai: “शिवसेना जमीनदोस्त होणार” या गिरीश महाजन यांच्या विधानानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शिवसेना संपवणं तुमच्या दहा पिढ्यांना देखील शक्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंआहे. गिरीश महाजन म्हणजे पक्षफोडाचा दलाल : संजय राऊत संजय राऊत म्हणाले, “भ्रष्ट, ठेकेदार आणि दबावाचं राजकारण करणारे गिरीश महाजन हे भाजपकडून नेमलेले एक पक्षफोडू दलाल आहेत. पोलीस आणि पैशाच्या जोरावर लोकांना धमकावत ते आमचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्या दिवशी सत्ता आमच्याकडे येईल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असणार, याची खात्री बाळगा.” “शिवसेनेनेच चड्डीची नाडी बांधायला शिकवलं” गिरीश महाजन यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना लाज वाटायला हवी, असं म्हणत राऊत पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात उभं केलं. शिवसेनेनेच तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवलं. आता तुम्ही शिवसेनेला संपवण्याची भाषा करता? ही तुमची ओळख विसरू नका.” असंही राऊत म्हणाले. “भयग्रस्त महाजन पक्ष सोडायला तयार होते” “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांच्यावर चौकशा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी ते पक्ष सोडून शांत बसण्याच्या तयारीत होते. निरोप पाठवत होते की ‘मी राजकारणातून बाहेर पडतो.’ हे डरपोक आहेत. त्यावेळी घाबरून गेले होते,” असा गौप्यस्फोट देखील संजय राऊत यांनी केला. “महाजन, शाह आणि भाजप महाराष्ट्रद्रोही!” संजय राऊत म्हणाले, “अमित शाह हे शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र द्रोही लोकांनी आमचा विचार संपवण्याचा विडा उचललाय. पण शिवसेना विचारांचा पक्ष आहे. हे केवळ काही माणसं फोडून होणारं काम नाही.” “राजकारण नाचेगिरी नाही” “गिरीश महाजन यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांचं वागणं नाचेगिरीसारखं आहे. पाच माणसं फोडून पक्ष फोडल्याचा दावा करणं हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला, पण त्यांच्याच काळात काँग्रेस बळकट झाली आणि भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे भाजपची लाजिरवाणी अवस्था आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

धक्कादायक… ! अकोल्यात दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्याच्या भावाची निर्घृण हत्या

Newsworldmarathi Akola: शहरात गुन्हेगारीचा कहर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे धाकटे बंधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल (वय 60) यांची थरारक हत्या करण्यात आली आहे. आरोपीचा महेंद्र पवार असं नाव असून तो जामिनावर बाहेर असलेला सराईत गुन्हेगार आहे. रणपिसे नगरात दिवसाढवळ्या खून ही घटना अकोल्यातील रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवर परिसरात घडली. महेंद्र पवारने धारदार लोखंडी टिकासने संजय कौसल यांच्या डोक्यावर आणि छातीत अनेकवार वार केले, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीमुळे खळबळ महेंद्र पवार याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका प्रकरणात तो तुरुंगात गेला होता आणि अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्याने ही हत्या केली. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक केली आहे. नव्या एसपींसमोर मोठं आव्हान विशेष म्हणजे, अकोल्याचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी नुकतेच पदभार स्वीकारला असून त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच आठवड्यातच ही गंभीर घटना घडल्याने प्रशासकीय स्तरावरही खळबळ उडाली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात संताप संजय कौसल हे अकोल्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेस नेत्याचे बंधू असल्याने त्यांच्या हत्येने राजकीय व सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी पोलिसांकडून अधिक कडक कारवाईची मागणी केली आहे.

पुणे माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव खांडेकर

0
Newsworldmarathi pune: पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड या सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासद आहेत. पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच सर्व संचालक व सभासद यांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन चेअरमन शिवाजीराव खांडेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. शिवाजीराव खांडेकर यांचे शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, जिल्हाध्यक्ष रमेश इंगवले, जिल्हा सचिव इम्रान मुल्ला, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, अमीर मुलाणी, सचिव श्रीशैल चव्हाण यांच्या सह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.